नागपूर : नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात आज पुन्हा विरोधी पक्ष भाजपाकडून सावरकरांच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून आज विधानसभेत विदर्भावर चर्चेचा प्रस्ताव देण्यात आलाय. सरकारला अडचणीत आणण्याची रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षाची सकाळी 10 वाजता भाजपा पक्ष कार्यालयात बैठक होत आहे. तर दुसरीकडे विरोधकांना कसं उत्तर द्यायचं, सभागृहात काय भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या तीनही पक्षांची बैठक सकाळी 9.30 वाजता विधानभवनातील शिवसेना कार्यालयात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्ताव मांडत या मुद्द्यावर सभागृहात चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्ये कामकाजातून काढून टाकली. 



यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आहोत की ब्रिटनच्या? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. 


राहुल गांधींनी हे सांगून बरं केलं की ते सावरकर नाहीत. पण या देशातील प्रत्येकाला स्वत:चे नाव सावरकरांसोबत जोडून घेतल तर ते भाग्य असेल. काँग्रेस वाल्यांना स्वत:चं नाव सावरकरांसोबत जोडून घ्यायला लाज वाटत असेल तर आम्हाला 'मी पण सावरकर' लिहीलेल्या टोप्या घालताना अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदारांनी 'झी २४ तास'कडे दिली.