सांगली : पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. संग्रामसिंह देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेसकडून यानंतर त्यांचाच मुलगा विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


संग्रामसिंह देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत. तर माजी आमदार संपतराव देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत. काँग्रेसकडून विश्वजित कदम रिंगणात आहेत. यामुळे देशमुख आणि कदम घराण्यामध्ये ही लढत होणार होती पण आता विश्वजित कदम यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विश्वजित कदम हे युवक प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. विश्वजित कदम हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांचे पुतणे आहेत. शिवसेनेनं याआधीच काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता.