पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीतील सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाचे नितीन लांडगे विजयी झाले आहेत. महापालिकेच्या सभापतीपदासाठी नितीन लांडगे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण भालेकर उभे होते. परंतु लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 5 मतांनी हरवले आहे. लांडगे यांना 10 तर प्रवीण भालेकर यांना ५ मते मिळाली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात आज दि. 05 मार्चला ही निवडणूक पार पडली. यामध्ये पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संपूर्ण कामकाज पाहिले.


पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. स्थायी समितीतील संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित होता. स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. यात भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षाचा 1 नगरसेवक आहे.


भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे 16 सदस्य स्थायी समितीत आहेत.


व्हिप बजावूनही रवी लांडगे गैरहजर
भाजपाने सभापतीपदाची उमेदवारी नाकारल्यामुळे रवी लांडगे नाराज होते. त्यांनी त्यांच्या स्थायी समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा महापौरांकडे दिला होता. मात्र भाजपाने अद्यापही त्यांचा राजीनामा स्विकारलेला नाही.आज निवडणुकीपूर्वी भाजपाचे पक्षनेता नामदेव ढाके यांनी सर्व सदस्यांना व्हिप बजावला होता. मात्र तरी ही रवी लांडगे निवडणुकीला गैरहजर राहिले होते. त्यामुळे पक्ष आता त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.