मोठी बातमी ! पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात पोस्ट टाकणं पडलं महागात
पुणे : महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये दररोज होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाने राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच मुद्दावरुन सुरु झालेला वाद आता गुद्यावर आला आहे. पुण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन मारहाण केली. आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात एक पोस्ट टाकली होती. याचा जाब विचारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना मारहाण केली.
विनायक आंबेकर यांनी केलेल्या पोस्टविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
विनायक आंबेकर यांनी मागितली माफी
दरम्यान, या पोस्टनंतर विनायक आंबेकर यांनी माफी मागितली. माझ्या कवितेत शेवटच्या दोन ओळई चुकीच्या लिहिल्या गेल्या होत्या. त्या मागे कोणताही वाईट हेतू नव्हता तरीही त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं माझे नेते गिरीश बापट यांनी कळवल्यामुळे ती पोस्ट मागे घेत आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांची माफी मागत आहे. अशा शब्दात आंबेकर यांनी माफी मागितली आहे.
केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या विरोधातील आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलंय. आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.