ठाणे : राज्यात आणि केंद्रात शिवसेनेसोबत असलेली भाजप पहिल्यांदाच ठाण्याच्या सत्तेतून बाहेर आहे. येथे भाजपने खड्ड्यांसाठी आंदोलन केले. मात्र, तो केवळ फार्स असल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी आंदोलन केले त्या प्रभागात चारही नगरसेवक हे भाजपचेच आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गेली अनेक वर्षे ठाण्यातील खड्ड्यांसाठी आंदोलन तर सोडाच किंबहुना सभागृहात साधा निषेधाचा चकार शब्द न काढणाऱ्या भाजपने आज चक्क ठाण्यात रस्त्यांवरील खड्यांविरुद्ध आंदोलनाचा फार्स उरकला. 


ठाण्यातील तीन पेट्रोलपंप परिसरात खड्यांचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून खड्ड्यांमध्ये रोप लावून त्याला पुष्पगुच्छ अर्पण केले. विशेष म्हणजे, हा परिसर नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत येत असून या प्रभागातील चारही नगरसेवक भाजपचेच आहेत. 


एकीकडे भाजपचा हा फार्स सुरु असताना ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे कर्मचारी रस्त्यावरील हे खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत असल्याने भाजपची स्टंटबाजी उघड्यावर पडली. या आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी चक्क वाहतूक पोलिसांनीच खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.