प्रताप नाईक, झी  मीडिया, कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट कापण्यासाठी चक्क काळी जादू केली जात आहे. काही इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळू नये म्हणून त्यांची नावं कागदावर लिहीण्यात आली. कागदाला लिंबू, अंगारा, कुंकू, लोखंड टोचण्यात आलं आहे. कोल्हापुरात महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली. त्यासाठी इच्छुक उमेदवारांची नावं एका कागदावर लिहीण्यात आली आणि त्याला लिंबू, अंगारा, काळा दोरा आणि लोखंड टोचण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर हा कागद मिळाला आहे. हे कृत्य विरोधकांनी केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. निवडणूक जवळ आली की लॉबिंग, प्रचार, इच्छुकांची गर्दी, एकमेकांविरोधात काड्या करणं हे येतंच. पण विरोधकांचं तिकीट कापण्यासाठी खच्ची करण्यासाठी काळी जादू वापरली जात असेल तर हे फारच भयानक आहे. 



कोल्हापूर शहरामधला आठवड्यातला हा दुसरा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वी  कळंबा स्मशानभूमीमध्ये काही मुलांची नावं लिंबावर लिहून त्याला टाचण्या टोचण्यात आल्या होत्या. छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूरला लाज आणणारा हा प्रकार आहे. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक ते थेट लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक वेळा करणीचे प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात पहायला मिळाले आहेत.


 कोल्हापूर महानगरपालिका पालिका निवडणूकिच्या निमित्ताने देखील अनेक असे प्रकार अनेक वेळा निदर्शनास आले आहेत. त्यामुळे अशा कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या लोकांना निवडणुकीत अद्दल घडविण्याची गरज आहे. तरच असे प्रकार रोखण्यात यश येईल.