खेडमध्ये चालत्या गाडीचा स्फोट, वाहन चालकाचा मृतदेह जळून खाक
वाहन चालकाची ओळखही पटवता आली नाही.
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर एक विचित्र भीषण अपघात पाहायला मिळाला. एका कारला अचानक आग लागली आणि परिसरात खळबळ उडाली. वाहन चालकाचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. गाडीला आग लागल्याची घटना कळताच स्थानिक मदतीसाठी धावत आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. गाडीत स्फोट झाल्याने ही आग लागली. पण स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच वाहन चालकाची ओळखही पटवता आली नाही. स्थानिक पोलिसांनी यासंदर्भात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
खेड तालुक्यातल्या बोरजजवळ एका गाडीमध्ये भीषण स्फोट झाला आणि नंतर गाडीला आग लागली. हा स्फोट एवढा भीषण होता की जवळचं अख्खं बोरज गाव हादरुन गेलं. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पण तोपर्यत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. वाहनचालकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्याच्या मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला होता. ही गाडी कुणाची होती ? चालक कोण होता ? याचा तपास पोलीस करत आहेत.