लातूर: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे राज्यभरातील वातावरण तापले असताना आता यामध्ये बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने उडी घेतली आहे. रितेशने लातूर येथील काँग्रेस मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. यावेळी रितेशने, ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं, असे म्हणत मोदींना टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात देश चालवायला ५६ इंचाची छाती लागते. मात्र ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते. देश चालवायला ५६ इंचाची छाती नाही चांगले हृदय लागते, असे रितेशने म्हटले. रितेश देशमुखचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी रितेशने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे योगदान किती मोठे आहे, याची आठवणही भाजपला करून दिली. भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही काँग्रेसची देणगी आहे, हे भक्तांनी लक्षात घ्यावे. तुमच्या खिशात असलेला मोबाईल काँग्रेसने दिला आहे, लातूरमध्ये मोबाईल सेवा साहेबांनी आणली आहे, असे रितेशने म्हटले. 



तसेच आपले घराणे काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचे रितेशने सांगितले. आमच्या नसानसांत काँग्रेस आहे, आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. आमचा जन्म काँग्रेसमध्ये झाला आहे. जिना यहॉ, मरना यहॉ इसके सिवा जाना कहा, अशी परिस्थिती असल्याचेही रितेशने सांगितले.