नवी मुंबईतील कळंबोली येथे शाळा परिसरात हातगाडीवर बॉम्ब
कळंबोली इथे बॉम्ब आढळला. सुधागड शाळेच्या बाहेरील हातगाडीवर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता.
नवी मुंबई : पनवेलच्या कळंबोली इथे आढळलेला बॉम्ब निकामी करण्यात आला. सुधागड शाळेच्या बाहेरील हातगाडीवर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. मुंबई आणि तळेगाव येथील सीआरपीएफच्या बॉम्ब शोधक पथकाने रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा बॉम्ब निकामी केला. या बॉम्बच्या स्फोटाच्या आवाजावरुन यात घातक रसायने वापरल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. तसेच ज्या हातगाडीवर हा बॉम्ब ठेवण्यात आला. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
कळंबोलीमधील सुधागड विद्यालयाच्या परिसरात सोमवारी एका हातगाडीवर बॉम्बसदृश वस्तू आढळली. या बस्तूबाबत पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर खाली केला. जेव्हावेळी या वस्तूची पाहणी केली असता तो बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पुण्याच्या सीआरपीएफच्या खास पथकाने हा बॉम्ब निकामी करण्याचे काम रात्री उशीरा सुरू केले होते. तो निकामी करण्यात पथकाला यश आले आहे. त्यामुळे मोठा धोका टळला आहे.
दरम्यान, टाईमर बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले आहे. बॉम्बसोबत सापडलेल्या घडयाळ्यातील वेळ तपासली असता या बॉम्बचा स्फोट १२ तासांनंतर झाला असता, असने नवी मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. बॉम्बशोधक पथक दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. मात्र श्वानपथक आणि बॉम्बशोधक यंत्राची मदत घेण्यासाठी पोलीस ठाण्याची इमारत सुरक्षित नसल्याचे या पथकाने सांगितल्यावर ही हातगाडी उद्यानाच्या मोकळ्या जागेत आणण्यात आली. त्यानंतर बॉम्ब निकामी करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. हा बॉम्ब खिडुकपाडा गावी निर्जनस्थळी त्यांनी बॉम्ब निकामी करण्यात आला.
असा आला संशय
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सुधागड विद्यालयात जवळपास आठ हजार मुले शिक्षण घेत आहेत. उन्हाळी सुटीनंतरचा शाळेचा आजचा (सोमवार) पहिलाच दिवस होता. सोमवारी दुपारी १२ वाजता शाळा भरली तेव्हा शिक्षकांनी प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळा सुरू झाली. शाळा आवार परिसरात एक हातगाडी विद्यालयाच्या सुरक्षारक आणि शिपाई यांनी पाहिली. त्यांना गाडीवर एक लाल रंगाचा खोका आढळला. तो उघडल्यावर त्यात आणखी एक थर्माकॉलचा खोका होता. त्यात बॅटरी आणि त्यावर घडयाळ लावल्याचे त्यांना आढळले. खोक्याच्या एका बाजूला पेट्रोल भरलेली बाटलीही आढलली. त्यांनी याची माहिती प्राचार्य इनामदार यांना दिली. संशय आल्याने प्राचार्य यांनी कळंबोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बॉम्बसदृश वस्तू असलेली हातगाडी ढकलत पोलीस ठाण्याच्या इमारतीपर्यंत आणली आणि बॉम्बशोधक पथकाला माहिती दिली.