Mumbai High Court On Whatsapp Status:  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्हॉट्सअप स्टेटसच्या संदर्भात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली आहे. व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट धार्मिक समुहाविरोधात द्वेष पसरवणारं साहित्य शेअर केल्याप्रकरणी दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी कोर्टाने नाकारली आहे. कोर्टाने व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून इतरांना काही संदेश देताना जबाबदारीची भावना आपल्याकडे असणं आवश्यक असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.


काहीतरी सांगण्यासाठी वापरतात व्हॉट्सअप स्टेटस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी एस. ए. मेनेजिस यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने 12 जुलै रोजी आपल्या आदेशात ही विधान केली आहेत. हल्ली व्हॉट्सअप स्टेटसचा वापर ओळखीतील व्यक्तींना काही गोष्टी सांगण्याच्या उद्देशातून केला जातो. अनेकजण आपल्या ओळखीच्या लोकांचे व्हॉट्सअप स्टेटस पाहत असतात, असंही कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने व्हॉट्सअप स्टेटस हे केवळ टाइमपास नसून संवादाचं एक माध्यमच असल्याचंही या प्रकरणासंदर्भात भाष्य करताना सांगितलं


कोण आहे आरोपी?


किशोर लांडकर नावाच्या 27 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात जाणूनबुजून धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अनुसूचित जाती/जमाती अधिनियम कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला. लांडकर याने ही एफआयआर रद्द करण्याची मागणी कोर्टात याचिका दाखल करत केली होती. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.


जबाबदारी आवश्यक


"व्हॉट्सअप स्टेटस म्हणजे तुम्ही काय पाहात आहात, काय विचार करत आहात हे दर्शवतं किंवा तुम्ही जे काही पाहिलं आहे तो फोटो किंवा व्हिडीओही व्हॉट्सअप स्टेटसमध्ये असतो. स्टेटस 24 तासांनंतर दिसेनासं होतं. व्हॉट्सअप स्टेटसचा हेतू एखाद्या व्यक्तीकडून आपल्या ओळखीच्या लोकांना काहीतरी सांगण्याचा असतो. आपल्या ओळखीच्या लोकांशी संपर्कात राहण्याची ही एक पद्धत आहे. त्यामुळेच इतरांना या माध्यमातून काहीही सांगता जबाबदारीने वागणं आवश्यक आहे," असं कोर्टाने आपलं निरिक्षण नोंदवताना म्हटलं. विचार करुनच व्हॉट्सअप स्टेटस ठेवायला हवं असं कोर्टाचं म्हणणं होतं.


स्टेटसमध्ये होतं काय?


तक्रारदाराने आपल्या तक्रारीमध्ये मार्च 2023 मध्ये आरोपीने एक व्हॉट्सअप स्टेटस अपलोड केलं होतं. या स्टेटसमध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला. तसेच स्टेटस पाहणाऱ्यांनी आश्चर्यचकित करणारं उत्तर जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करावं असं सांगण्यात आलं होतं. या स्टेटसमधील प्रश्न आपण गुगलवर सर्च केला असता माझ्या धार्मिक भावनांना धक्का बसला. त्या सर्च रिझल्टवर आक्षेपार्ह साहित्य होतं, असं तक्रारदाराने म्हटलं आहे.