अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : दहीहंडीतील कुप्रथांनां फाटा देत पुण्यात आज एक अनोखी दहीहंडी साजरी झाली. ही दहीहंडी होती पुस्तक दहीहंडी. विशेष म्हणजे ब्राझीलहून आलेले तरुण-तरुणी या दहीहंडीत राधा-कृष्णाच्या वेशात सहभागी झाले होते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पीकरच्या भिंती नाहीत तसेच आचरट म्हणावा असा डान्सही नाही. थरांचे विक्रमही नाहीत तसेच बक्षिसांचा पाऊसही नाही. अगदी पारंपरिक स्वरूपात हा दहीहंडीचा खेळ रंगला होता. वंदे मातरम संघटनेच्या पुढाकारातून स प महाविद्यालयाच्या चौकात गेली १२ वर्षं पुस्तक दहिहंडीचं आयोजन करण्यात येतं. 


या दहीहंडी उत्सवात यावर्षी खास विदेशी पाहुणे सहभागी झाले होते. महत्वाचं म्हणजे हे पाहुणे दहिहंडीमध्ये राधा-कृष्ण बनून आले होते. भारतीय संस्कृती तसेच परंपरा जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करतानाच त्यांनी हा उत्सव अगदी मनापासून एन्जॉय केला
 
यावेळी दहीहंडीला लटकवलेली पुस्तकं आवर्जून लक्ष वेधून घेत होती. समाजातील दात्यांकडून ही पुस्तकं मिळाली आहेत. आता ती नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.   


हल्ली उत्सवांना हिडीस रूप आल्याची तक्रार नेहमीच होते. मात्र पुस्तक दहीहंडीचा हा उपक्रम खरोखरच विधायक म्हणावा लागेल. गरज आहे ती इतरांनी त्यापासून प्रेरणा घेण्याची.