बॉयफ्रेंडसाठी कुंकवाच्या धन्याला संपवलं! मामा, मामी आणि भाडेकरु; सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर
Satish Wagh Murder Case : सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मामीने प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या मामाचा 5 लाख देऊन काटा काढला.
Satish Wagh Murder Case : पुण्यातल्या हडपसरच्या सतीश वाघ हत्याप्रकरणात मोठी माहिती समोर आलीय. एका आमदाराचा मामा असलेल्या सतीश वाघ यांची हत्या मामीनं घडवून आणलाय. पैसा, अधिकार आणि बॉयफ्रेंडच्या नादाला लागून मामीनं स्वतःच्याच कपाळाचं कुंकू पुसलंय. निवडणुकीनंतर सतीश वाघ यांची अपहरण करुन हत्या झाली होती. या हत्येमागं राजकीय हेतू असावा असा सुरुवातीला पोलिसांचा अंदाज होता. पण जेव्हा पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा मिळालेली माहिती पोलिसांनाच चक्रावून टाकणारी होती. सतीश वाघ यांची हत्या त्यांची बायको मोहिनी वाघ हिनंच घडवून आणली होती. सतीश वाघ हे पैशाचे व्यवहार मोहिनीला करु द्यायचे नाही. शिवाय दारु पिऊन सतीश वाघ सतत मारहाण करायचे त्यामुळं मामी मोहिनीनं त्यांच्या हत्येचा कट रचला, असं पोलीस तपासात समोर आलंय.
बॉयफ्रेंडसाठी कुंकवाच्या धन्याला संपवलं!
मामी मोहिनी वाघ हिचा भाडेकरु अक्षय जवळकर याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. प्रेमसंबंधात नवरा सतीश वाघ हे अडसर ठरत होते. त्यामुळं अक्षय आणि मोहिनीनं सतीश वाघ यांना संपवण्याचा निर्णय घेतला. मोहिनी वाघ हिनं अक्षयला पाच लाखांची सुपारी दिली होती. या हत्याप्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक पोलिसांनी करण्यात आलीय. सतीश वाघ हत्येच्या 15 दिवस आधीपासून मोहिनी आणि अक्षय या दोघांनी हा कट रचला होता.
आरोपींची नाव
1. मोहिनी वाघ
2. पवनकुमार शर्मा
3. विकास शिंदे
4. अतिश जाधव - धाराशिव
5. अक्षय जवळकर - सुपारी देण्यात आलेला व्यक्ती
काय म्हणाले पोलीस पाहा
भाड्याच्या खोलीत मुलाच्या मित्राशी सूत जुळलं
मोहिनी वाघ ही 48 वर्षाची असून अक्षय जावळकर हा 32 वर्षाचा आहे. अक्षय हा मोहिनीच्या मुलाचा मित्र असून तो या पूर्वी वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. तिथेच त्याच मोहिनीशी प्रेम संबंध जुळले. सतीश वाघ यांना या अनैतिक संबंधाची भनक लागली. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले आणि सतीश यांच्याकडून मोहिनीला मारहाण होत होती. म्हणून हा राग मनात ठेवून मोहिनी वाघने सतीश वाघ यांचा काटा काढला.
सतीश वाघ यांच्या हत्येचा तपास पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. एका आमदाराचे सतीश वाघ मामा असल्यानं हायप्रोफाईल हत्येचा तपास करणं मोठं आव्हान होतं. पोलिसांनी या प्रकरणात सतीश वाघ यांच्या बायकोलाच जेरबंद केलंय. पैसा, प्रियकर आणि सत्ता याच्या मोहात मोहिनीनं स्वतःच्या नवऱ्याचाच घात केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
9 डिसेंबरला पहाटे सतीश पहाटे घराजवळ मॉर्निंग वॉक करत असताना त्यांचे अज्ञातांनी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांतच चारचाकी कारमध्ये त्यांचा खून करण्यात आला होता. नंतर शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं होतं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.