मुंबई : सर्वसामान्यपणे सिनेमात काय दाखवायचं याचा निर्णय सेन्सॉर बोर्ड घेतं, गृहविभागाशी त्याचा काही संबंध नाही. पण सुरक्षेचा प्रश्न आल्यास ती पुरवली जाते. पोलिसांनाही मर्यादा आहेत, असं आज गृहाराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी  दशक्रिया सिनेमा वादावर स्पष्ट केले.


पुण्यात दशक्रिया सिनेमा प्रदर्शित  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, ब्राह्मण संघटनांचा विरोध डावलून पुण्यातील बहुतेक चित्रपटगृहांत दशक्रिया हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाबद्दल वादाच्या पार्श्वभूमिवर हा चित्रपट आज प्रदर्शित होईल की नाही याबद्दल संभ्रम होता. पुण्यातील चित्रपट गृह दशक्रिया दाखवणार नसल्याचा दावा ब्राह्मण संघटनांनी केला होता. 


किंबहुना चित्रपटगृह चालकांनीही तशी तयारी काल म्हणजे गुरुवारी दर्शवली होती. त्यानुसार अनेकांनी या चित्रपटाचं बुकींग थांबवलं होतं. आज मात्र हा चित्रपट दाखवला जाणार असल्याचं स्पष्ट झालय. यांदर्भात कायदा हातात घेणार नसल्याचं ब्राह्मण संघटनांनी आधीच स्पष्ट केलंय. 


बंदी घालण्याची याचिका फेटाळल्यानंतर


दरम्यान, औरंगाबाद खंडपीठानं दशक्रिया चित्रपटावर बंदी घालण्याची याचिका फेटाळल्यानंतर चित्रपटाचा वाद आणखीनच चिघळला. औरंगाबादच्या प्रोझोन या एकमेव मॉलमध्ये हा सिनेमा दाखवण्याला सुरुवात झाल्यानंतर पैठण येथील पुरोहितांनी या सिनेमाच्या प्रदर्शनाला जोरदार विरोध केला.


प्रोझोनमॉलमध्ये घुसून या सिनेमाचा शो बंद पाडला. सुरुवातीला प्रोझोन प्रशासनाने पुरोहितांना शो बंद करण्यास नकार दिला. मात्र पुरोहितांनी आक्रमक धोरण अवलंबून प्रोझोन मॉलमध्ये ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि सुरू झालेला शो बंद पाडला. 


औरंगाबादमध्ये जोरदार राडा


मात्र यानंतर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मॉलमध्ये आले आणि त्यांनी सिनेमा गृहाला संरक्षण देत सिनेमा प्रदर्शित करण्याची मागणी प्रोझोनकडे केली. त्यामुळे संतापलेले पुरोहित आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी झाली.


मात्र प्रोझोनकडून कोणत्याही परिस्थितीत हा सिनेमा दाखवला जाणार नसल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर पुरोहितांनी आक्रमक भूमिका सोडून दिली. त्यामुळं न्यायालयाच्या निर्णयानंतरही औरंगाबादमध्ये दशक्रिया प्रदर्शित होऊ शकला नाही.