कल्पनाही करु शकत नाही असं घडलं, पाळीव कुत्रा निमित्त ठरला... बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू
दोघा बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भाऊ रणजीत हा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते. तर त्याची बहिण किर्ती देखील अभ्यासात खूपच हुशार होती.
Dombivali News : कुणी कल्पनाही करु शकत नाही अशी भयानक घटना बहिण भावासह घडली आहे. त्यांचा पाळीव कुत्रा मृत्यूच निमित्त ठरला आहे. तलावात बुडून बहिणी भावाचा दुर्दैवी अंत झाला आहे. डोंबिवलीत ही धक्कादायक घटना घडली आहे. दोघेही भावंड उच्च शिक्षण घेत होते. दोघेही अभ्यासात खूप हुशार होते (Dombivali News).
डोंबिवली पूर्व येथील दावडी परिसरात ही घटना घडली आहे. येथील तलावात भाऊ बहिणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कीर्ती रवींद्रन आणि रणजित रवींद्रन असं मृत्यू झालेल्या या दोघा भाऊ बहिणीचे नाव आहेत.
काय घडलं नेमकं?
डोंबिवली पूर्वेकडील दावडी परिसरात ही हृदयद्रावक घटना घडलीय. दोघेही डोंबिवली पश्चिम महाराष्ट्र नगर मधील रहिवासी आहेत. हे दोघे भाऊ बहिण या तलावात आपल्या पाळीव कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी आले होते. त्यावेळेस खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
दोन तासानंतर मृतदेह सापडले
पोलिस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तास शोधकार्य करून या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. कीर्तीचा नुकताच अकरावीचा रिझल्ट लागला होता. किर्तीला 98 टक्के मार्क मिळाले होते. तर, रणजीत हा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. या दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
तलावाच्या शेजारी मानवी कवटी, पायांची हाडं आणि कपडे सापडल्याने खळबळ
लातूरच्या लेंडेगावात एका पाझर तलावाच्या शेजारी मानवी कवटी, पायांची हाडं आणि कपडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. तलावात काही मुले पोहण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. गावातीलच एक तरुण चार महिन्यापासून बेपत्ता आहे. त्याचाच हा सांगाडा असावा असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
पोहायला गेलेला तरुण पाण्यात बुडून बेपत्ता
हिंगोलीत पोहायला गेलेला एक तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील बोथी तलावात ही दुर्घटना घडली आहे. दीपक मारकळ असं या 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. 27 मे रोजी दुपारी ही घटना घडली. संध्याकाळी अंधार पडेपर्यंत आखाडा बाळापूर पोलीस आणि गावकरी तरुणाचा शोध घेत होते.