अन्यथा सत्तेची पर्वा नाही, एकनाथ शिंदे गटातील आमदाराचा भाजपला थेट इशारा
Sanjay Gaikwad on Kirit Somaiya : `उद्धव आणि आदित्य ठाकरे हे एकटे पडलेत, असं समजून कोणीही बेताळ वक्तव्य करु असं कोणी समजू नये`.
मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा : भाजपचे माजी खासदार आणि नेते हे सातत्याने शिवसेनेवर टीकास्त्र सोडत असतात. राज्यात महाविकास आघाडी असताना सोमय्या यांच्या तक्रारीमुळेच अनेक मंत्री हे इडीच्या रडारवर आले. आता राज्यातील चित्र बदललंय. राज्यात सत्तापालट झालंय. राज्यात आता एकनाथ शिंदे गट-भाजपचं सरकार आहे. यानंतरही सोमय्या उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करतच आहेत. (buldana rebel eknath shinde group mla sanjay gaikwad warned to kirit somaiya due to he critisized uddhav thackeray)
उद्धव ठाकरे यांच्यावर सोमय्या यांच्याकडून करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण टीकेवरुन बुलढाण्याचे आमदार आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट सोमय्या यांना इशाराच दिलाय. बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी किरीट सोमय्यांविरोधात डरकाळी फोडली आहे.
आमदार गायकवाड काय म्हणाले?
"किरीट सोमय्या यांच्या वाचाळ वक्तव्यांमुळेच शिवसेना-भाजप यांच्यात दुरावा निर्माण झाला. सोमय्या वांरवार मातोश्रीबाबत एकेरी आणि अपमानास्पद बोलत होते. यामुळेच मागे अनेक वेळा तणाव निर्माण झाला. सोमय्या यांनी समजून घ्यावं, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून बाहेर पडलो. याचा अर्थ असा नाही की उद्धव ठाकरे यांचा तिरस्कार करतो. तसेच उद्धव ठाकरे यांना कोणी शिव्या शाप देईल, हे आम्ही खपवून घेऊ, असा समज करु नयेत", असा इशारा आमदार गायकवाड यांनी दिला.
"मातोश्री आमचं तिर्थस्थान आहे. आमचं प्रेरणास्थान आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत आम्हाला आजही प्रेम, आदर आणि स्नेहभाव आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे हे एकटे पडलेत, असं समजून कोणीही बेताळ वक्तव्य करु असं कोणी समजू नये", असं आमदार गायकवाड यांनी स्पष्टच सांगितलं.
"सोमय्याच्या तोंडाला लगाम लावायला पाहिजे"
शिवसेना-भाजपला भविष्यात एकत्र काम करायचं असेल, तर वरिष्ठांनी सोमय्याच्या तोंडाला लगाम लावायला पाहिजे. आम्ही सत्तेला ठोकर मारुन मंत्रिपद सोडून आलो आहोत. मंत्रिपद सोडून आमची माणसं आली आहेत. आम्हाला सत्तेची पर्वा नाही. अशा प्रकारचं वागणं आम्ही खपवून घेणार नाहीत, असंही गायकवाड यांनी ठासून सांगितलं.
असं फुटलं वादाला तोंड
एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. यानंतर सोमय्या यांनी शिंदे यांची भेट घेतली. सोमय्या यांनी भेट घेतल्यानंतर शिंदे यांचं कौतुक तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं ट्विट केलं. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचा माफिया असा उल्लेख केला होता. या संपूर्ण प्रकरणावरुन या वादाला तोंड फुटलं.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत आधी नाराजी व्यक्त केली. याबाबत केसरकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता आमदार गायकवाड यांनी थेट सोमय्या यांच्यावर हल्लाबोलच केला आहे. त्यामुळे आता भाजपकडून सोमय्या यांना काय सांगितंल जातं का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.