राजा कायम राहणार? पावसाची काय स्थिती? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भेंडवळची भाकीतं जाहीर
Buldhana Bhendval: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीची भाकिते आज जाहीर झाली आहेत. यामध्ये अतिवृष्टीसह शेतकऱ्यांना अवकाळीचाही फटका बसण्याची शक्यत व्यक्त केली आहे.
मयूर निकम, बुलढाणा
Buldhana Bhendval: जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीची भाकीते आज जाहीर झाली आहेत. सकाळी सहा वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. यंदा महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या पीक पावसाची स्थिती सांगताना जून महिन्यात पाऊस कमी असेल असं सांगण्यात आलं आहे. तर जुलैमध्ये साधारण आणि ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस असून अतिवृष्टीचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी असेल. मात्र अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे असं भाकीत सांगण्यात आलं आहे.
पिकाबाबत केलेली भाकिते -
जून - कमी अधिक पाऊस येणार, पेरणीला उशीर होऊ शकतो.
जुलै - सर्वसाधारण,
ऑगस्ट - एकदम चांगला पाऊस येणार, अतिवृष्टीची शक्यता आहे.
सप्टेंबर - पाऊस कमी आहे, पण अवकाळी पाऊस पडू शकतो.
दरम्यान राजकीय आणि देशाच्या स्थितीची भाकीतंही वर्तवण्यात आली आहे. घागरीच्या बाजूला ठेवलेला पान विडा म्हणजे राजाचं प्रतीक आहे. त्या पानविड्यावर सुपारी स्थिर असल्याने राजा (पंतप्रधान) कायम राहील असा त्याचा अर्थ समजला जातो. मात्र राजाभोवती तणाव राहणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे.
घागरी वरील पुरी गायब झाल्याने अतिवृष्टी होईल, भूकंप होईल असे संकेत आहेत. देशाची अर्थव्यवस्था सारखी नसेल असं सांगण्यात आलं आहे.
घागरीत पाणी असल्याने समुद्रात भरपूर पाणी राहील. तसंच यावर्षी विषारी वर्ष म्हणजे रोगराई पसरणार असल्याची भीती वर्तवली आहे. याशिवाय पारावरच्या घट मांडणीत पहिल्यांदाच विंचू निघाल्याने देशात रोगराईची परिस्थिती असणार असे भाकीत यंदा वर्तवण्यात आलं आहे..