बुलढाणा: काही दिवसांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात बुरशी आलेले सॅम्पल्स सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता आणखीन एक अजब प्रकार समोर आला आहे. कोरोनाची चाचणी न करताच व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंडितराव देशमुख यांना अस्वस्थ वाटत होते. त्यासाठी ते मोताळा येथील कोव्हिड सेंटरमध्ये तपासणी करण्यासाठी गेले. मात्र त्या ठिकाणी त्यांनी फक्त आपली नाव नोंदणी केली.


डॉक्टरांनी देशमुख यांना सकाळी 11 वाजताचा तपासणीसाठी वेळ दिला. त्यावेळी देशमुख तिथे गेलेच नाहीत. कोव्हिड सेंटरमध्ये कोणतेही स्वॅबही दिला नाही. तरी तिथून तुमचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा फोन आल्यानं मात्र मोठी खळबळ उडाली. 


तुम्ही कोरोना सेंटरमध्ये यावे आणि उपचार घ्यावे असा सल्लाही या फोनवर देण्यात आला. स्वाब न  देता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा हा प्रश्न देशमुख यांना पडला आहे. मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये जाऊन याबाबत विचारणा केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली. त्यामुळे स्वॅब न देताच रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा हा प्रकार जरा अजब आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठांनी तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.