बुलडाण्यात पैनगंगेचा मूळ प्रवाह बदलण्याचा प्रयत्न
बुलढाणा जिल्ह्यात उगम पावणारी पैनगंगा... तब्बल सहाशे किलोमिटर लांबीची ही नदी....शेतक-यांची जीवनदायिनी असलेल्या पैनगंगेचा मूळ प्रवाहच बदलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यात उगम पावणारी पैनगंगा... तब्बल सहाशे किलोमिटर लांबीची ही नदी....शेतक-यांची जीवनदायिनी असलेल्या पैनगंगेचा मूळ प्रवाहच बदलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेहकर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय. याबाबत महसुल विभागाकडे तक्रार कण्यात आलीय. गजानन देशमुख, विठठ्ल देशमुख आणि वनमाला देशमुख यांची शेतजमीन पैनगंगेच्या किनारी आहे. पात्र खोदून त्यातला भराव शेतात आणि नदीत टाकलाय. त्यामुळं प्रवाहाची दिशा बदलली. पण या बदलल्या प्रवाहामुळे दक्षिणेकडून पाणी येऊन शेकडो हेक्टर जमीन खरडून जाण्याची भीती असल्याची तक्रार करण्यात आलीय.
नदीपात्रात खोदकाम आणि मातीचा भराव टाकण्याबाबत संबंधित विभागांची परवानगी घेतली का... याबाबत विचारणा करताच गजानन देशमुख आणि वनमाला देशमुख यांची उत्तर- ही अशी होती. याबाबत कुठलीही परवानगी घेतली नसल्याच खुद्द तहसीलदारांनीच सांगितलं. या अवैध कामावर त्वरित कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं.
इतके दिवस नदीपात्रात खोदकाम सुरु होतं त्यावेळी संबंधित अधिकारी झोपेत होते का... मशीन जप्त करण्यात आली होती पण ती मशीन आता गायब झाली. रातोरात गायब झालेल्या मशीनबाबत अधिकारी साधी चौकशीही करत नाहीत.. तक्रारदारांचं साधं म्हणणही उपविभागीय अधिकारी ऐकुन घेत नाही, उलट तक्रारदार शेतक-यांना गप्प करून दोषींना पाठीशी घातलं जातंय.
पावसाळा तोंडावर आलाय, बदललेल्या प्रवाहामुळे उभं पिक हातून जाण्याची भीती शेतक-यांना आहे. त्यामुळं दोषींवर कारवाईची मागणी शेतकरी करतायत. नदीच्या बदललेल्या प्रवाहाकडे अधिकारी वर्ग अर्थपूर्ण दुर्लक्ष करतंय. या बातमीनंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि शेतक-यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.