जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : कृषी संस्कृतीचा महत्वाचा आधार म्हणजे बैल... याच बैलांनी वाघाच्या हल्ल्यातून शेतकऱ्याचा जीव वाचवल्याची अनोखी घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे... वाघाच्या हल्ल्यातून शेतकऱ्याचा जीव वाचवणाऱ्या बैलांचं कौतुक होतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी नागपूर जिल्ह्याच्या कोंढाळी गावानजीकच्या मेट गावातील शेतकरी मनोहर कुरमेते सकाळी दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या बैलजोडीला घेऊन जंगलाशेजारी असलेल्या शेतात निघाले. रस्त्यावरून जात असताना झुडपात वाघ दबा धरून बसला होता.. काही कळायच्या आताच वाघाने बैलांवर हल्ला केला... बैल सैरावरा होऊन बाजूला झाली... बैल बाजूला झाल्याचे पाहताच वाघाने मनोहर कुरमेते यांच्यावर हल्ला चढवला... वाघ आणि कुरमेते यांची झुंज सुरु असताना त्यांच्या दोन्ही बैलांनी आपल्या धन्याचे प्राण वाचवण्यासाठी वाघावर हल्ला चढवला. बैलांचं रौद्र रूप पाहून वाघ जंगलात पळून गेला. 


कोंढाळी वनपरिक्षेत्र हे बोर  व्याघ्रप्रकल्पालगत असल्याने या भागात वाघाचा वावर वाढलाय. गुरांवर हल्ल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागलीय. मात्र ज्या मुक्या बैलांनी आपल्या धन्याचे प्राण वाचवले त्यांचं सध्या पंचक्रोशीत कौतुक होत आहे.