किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील घरफोड्या काही केल्या कमी होत नाहीत. पोलीस रात्रीच्या वेळी गस्तीवर असतानाही चोरटे मात्र कुठल्या ना कुठल्या भागात डल्ला मारुन जातात. त्यामुळे नाशिक शहरातले पोलीस टिकेचे धनी ठरत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून कुठल्या ना कुठल्या पोलीस ठाण्यात घरफोडीची किमान एकतरी घटना घडतच आहे. नाशिक शहर पोलिसांकडून सुरू असलेली ऑल आऊट ऑपरेशन मोहीम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. 


तर ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदीही कमी प्रमाणात सुरु असल्यानं, घरफोडीच्या घटना वाढत असल्याचा नागरिकांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी सार्वजनिक कार्यक्रमातून वेळ काढून पेट्रोलिंग वाढवलं पाहिजे, अशी उपहासात्मक टीका नाशिककर करू लागलेत.



यावर सर्व बाजूंनी प्रयत्न सुरु असून लवकरच घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण मिळवू इतकाच दावा पोलीस आयुक्त करत आहेत. सध्या तरी चोरांनी पोलिसांवर कडी केल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी नाशिक पोलिसांनी घरफोडी करणाऱ्यांचा मुसक्या आवळणं गरजेच आहे.