मुंबई-गोवा हायवेवर अपघात सत्र सुरूच, दोन एसटींची समोरासमोर धडक
मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. चिपळूण परशुराम घाटाच्या पायथ्याशी दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झालाय.
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. चिपळूण परशुराम घाटाच्या पायथ्याशी दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झालाय. मुंबई चिपळूण आणि रत्नागिरी नालासोपारा एस टी बस एकमेकांवर आदळल्या.
सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. यात ३० जण जखमी झालेत. जखमींवर चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमानी सध्या परतू लागलेत, त्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. त्यातही अनेक चालक वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत, त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळतं.
सध्या मुंबई -गोवा महामार्गावर होत असलेले अपघात चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळेच होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन दिवसात तीन मोठे अपघात झाले असून यामध्ये तिघांना आपले प्राण गमवावे लागलेत. एका चालकाच्या चुकीची शिक्षा इतर प्रवाशांना भोगावी लागत आहे. त्यामुळे चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.