कार पुलावरुन कोसळली नदीत; टपावर चढून कुटुंबाने वाचवला जीव
घोटी गावातील या नदीवर पुलाला कठडा नसल्याने अश्रफ यांना त्याचा अंदाज आला नाही.
नवी मुंबई: पनवेल तालुक्यातील तळोजातील घोटी नदीच्या पुलावर सोमवारी दुपारी थरारक प्रसंग पाहायला मिळाला. या पुलावरून जाणारी एक कार नियंत्रण सुटून थेट नदीत कोसळली. पावसामुळे नदीच्या पाण्याला प्रचंड वेगही होती. मात्र, सुदैवाने गावकरी वेळीच मदतीला धावून आल्याने या कुटुंबाचा जीव वाचला.
तळोजातच राहणारे अश्रफ शेख त्यांची पत्नी हमीदा आणि सात वर्षांची मुलगी सुहाना आणि भावाची मुलगी रुक्साना बाहेर जात होते. घोटी गावातील या नदीवर पुलाला कठडा नसल्याने अश्रफ यांना त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार नदीत पडली. हे बघितल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत पहिल्यांदा सगळ्यांना कारच्या टपावर येऊन बसायला सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ दोरीच्या सहाय्याने या कुटुंबाला बाहेर काढले. त्यानंतर कारही नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली.