जागतिक किर्तीचा दिव्यांग सायकलपटू तीन दिवसांनंतरही बेपत्ता
पुण्याच्या पुरात दिव्यांग सायकलपटू वाहून गेला, तीन दिवसांनंतरही बेपत्ता
कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : पुण्यात झालेल्या पावसाने हाहाकार माजवला. या पुराने अनेकांचे संसार उद्धवस्त केले. याच पुरात २६ वर्षीय दिव्यांग सायकलपटू व्हिक्टर सांगळे बेपत्ता झाला आहे.
व्हिक्टरला तो अकरावीत असताना पायाला कॅन्सर झाला. त्यात त्याला एक पाय गमवावा लागला. पण तो हरला नाही. त्याने जिद्द सोडली नाही. त्याने कृत्रिम पाय बसवला. त्या आधारावर त्याने सी ए पर्यंत शिक्षण घेतलं.
एवढेच नाही तर तो उत्कृष्ट सायकल पटू होता. मॅरेथॉनमध्ये ही तो सहभाग घ्यायचा. नुकतेच त्याने १३ हजार ५०० फूट उंचीवर सेला पास सायकल मोहिम पार पाडली. पण पुण्याच्या पावसात त्याची कार वाहत गेली आणि तो बेपत्ता झाला. हा उमदा तरुण असा बेपत्ता झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
खळखळत्या उत्साहाचा अखंड झरा...असंख्य तरुणांचं प्रेरणास्थान...दुर्दम्य इच्छशक्ती आणि आशावादाचं प्रतीक...जागतिक किर्तीचा दिव्यांग सायकलपटू अशी त्याची ओळख...
२५ सप्टेंबरच्या त्या काळरात्री व्हिक्टर परदेशातून आलेल्या भावाला भेटायला गेला होता. पण त्या दिवसापासून तो बेपत्ता आहे. वानवडीमधल्या गंगासॅटेलाईट जवळच्या पूलावरुन तो ज्या कारने प्रवास करत होता ती नाल्यात सापडली.
व्हिक्टरची कार वाहून गेली, तो पूल कायमच पाण्याखाली जातो. वेळीच पर्यायी व्यवस्था केली असती किंवा पूल वाहतुकीसाठी बंद केला असता तरी व्हिक्टर सहीसलामत असता, असं त्याचे सहकारी सांगतात. हा व्यवस्थेचा बळी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
पुण्यामध्ये झालेली अतिक्रमणं, नाले, ओढ्यांवर झालेली बेसुमार बांधकामं, त्याला मिळणारं राजकीय संरक्षण यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यातच निकृष्ट दर्जाचे पूल, घाईत केलेली कामं पुणेकरांच्या जीवावर उठली आहेत.