कंटेन्मेंट झोनमध्ये गेल्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल
पोलिसांनी हा परिसर सील केला असून याठिकाणी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाही.
औरंगाबाद: सरकारी आदेशाचे उल्लंघन करुन कंटेन्मेंट झोनमध्ये गेल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषदेतील आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या अष्टी येथे राहणारे सुरेश धस सोमवारी सकाळी आपल्या मतदारसंघात दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी पाटण सांगवी या परिसरातील रहिवाशांचीही भेट घेतली. मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पाटण सांगवी हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पोलिसांनी हा परिसर सील केला असून याठिकाणी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाही.
Lockdown 4.0: वाचा राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?
मात्र, तरीही सुरेश धस यांनी या परिसरात जाऊन नागरिकांची भेट घेतली. त्यामुळे अष्टी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात कलम १८८ अंतर्गत ( सरकारी आदेशाचे उल्लंघन) आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अष्टी पोलीस ठाण्याचे प्रमुख माधव सूर्यवंशी यांनी दिली.
आता आदेश फक्त मीच देणार; गोंधळ टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
कालच सांगवी पाटण येथे कोरोनाबाधित आढळलेल्या ६५ वर्षीय महिलेचा पहाटे मृत्यू झाला होता. हा बीडमधील कोरोनाचा पहिला बळी आहे. बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे. आता बीड जिल्ह्यात एकूण आठ कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सात जण हे १३ मे रोजी मुंबईतून निघाले होते. १४ तारखेला आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाईकांकडे आले होते. हे सर्व पिंपळगाव खुडा अहमदनगर येथील रहिवाशी आहेत.