Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलनामुळे अनेकांचे दिवाळे निघाले आहे. क्रिप्टो व्यवहारांमध्ये मोठे आर्थिक घोटाळे झाल्यामुळे देशात यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.  जगभरात बहुतेक बिटकॉईन (bitcoin) या लोकप्रिय आभासी चलनाद्वारे क्रिप्टोकरन्सीचे (cryptocurrency) व्यवहार होत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातही या क्रिप्टोकरन्सीच्या घोटाळ्याचे जाळे पसरत असल्याचे समोर आले आहे. थेट राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्यांच्या कुटुंबियांपर्यंत क्रिप्टो व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आता शिंदे गटातील एका बड्या नेत्याच्या जावयावर क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचा जावई टीम इंडियाचा अंडर 19चा माजी कर्णधार विजय झोलवर (Vijay Zol) याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना गुंडाकरवी पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप विजय झोलवर करण्यात आलाय. जालन्यातील (Jalna) घनसांगी पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


नेमकं प्रकरण काय?


उद्योजक किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून विजय झोल यांनी गुंतवणूक केली होती. मात्र क्रिप्टोकरन्सीची बाजार मूल्या (मार्केट व्हॅल्यू) घसरल्याने खोतकर यांच्या जावयाने किरण खरात यांना दोषी धरले. यासाठी मला दोषी धरुन क्रिकेटर विजय झोल आणि त्यांच्या भावाने घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप किरण खरात यांनी केला. यानंतर पोलिसांनी विजय झोल आणि त्याचा भाऊ विक्रम झोल याच्यासह 15 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


कोण आहेत किरण खरात?


तक्रारदार किरण खरात हे उद्योजक असून क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रमोटर म्हणून काम करत होते. क्रिप्टोच्या व्यवहारातून किरण खरात यांना बीएमडब्लू कारही गिफ्ट मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकांनी याकडे आकर्षित होऊन क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवले होते. यामध्ये विजय झोल यांनीही पैसे गुंतवल्याचे समोर आले आहे. मात्र जागतिक मंदीमुळे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे बुडाले. किरण खरात यांनी 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे किरण खरात यांनीच आपल्याला धमकावल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.