प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळा गडावर (panhala fort) चार दिवसांपूर्वी दारु पार्टी रंगल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर संतप्त शिवभक्तांनी पन्हाळा गडावर एकत्र येत संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी पर्यटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवभक्तांतर्फे करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता ऐतिहासिक पन्हाळा गडावरील दारु पार्टी झालेल्या झुणका भाकर केंद्रावर आणि पर्यटकांवर पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ऐतिहासिक पन्हाळा गडावर चार दिवसापूर्वी काही पर्यटकांनी झुणका भाकरी केंद्रावर ओली पार्टी केली होती. या पार्टी मध्ये महिला पर्यटकांचा देखील सहभाग होता. 


त्यानंतर ही बातमी झी 24 तासने पुराव्यानिशी दाखवली होती. त्यानंतर उशिरा जाग आलेल्या पन्हाळा पोलिसांनी झुणका भाकरी केंद्राची झडती घेत दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. त्यानंतर झुणका भाकर डॉट-कॉम या नावचे झुणका भाकर केंद्र आणि ओली पार्टी करणाऱ्या सर्व पर्यटकांवर महाराष्ट्र दारू बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दिलीप गणपती अतिग्रे असे झुणका भाकर चालविण्याऱ्या व्यक्तीचे नाव आहे. भर रस्त्यावर असणाऱ्या या झुणका भाकर केंद्रामध्ये ओली पार्टी सुरु होती. त्यानंतर झी 24 तासने सर्वप्रथम ही बातमी दाखवीत झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जागं केलं आहे.


दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक किल्ल्यांवर सर्रास अशा प्रकारे पार्ट्या होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी दिसून येत आहे. पन्हाला गडावरील व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत अशा पर्यटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.