संभाजी भिडेंविरोधात राज्यभरात आंदोलने तर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल; काँग्रेसने केली होती तक्रार
Sambhaji Bhide : संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गाधींबाबत केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. अमरावतीमध्ये केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही उमटल्याचे पाहायला मिळत आहे.
Sambhaji Bhide : अमरावतीच्या (Amravati News) राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये एका सभेत महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता भिडे यांच्याविरोधात गुन्हा (Amravati Police) दाखल करण्यात आला आहे. राजापेठ पोलिसांनी प्रक्षोभक भाषण करणे, 153 कलमांतर्गत संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसने (Congress) भिडेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. अमरावती काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकुमार यांनी शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी तपास करुन गुन्हा दाखल करु असे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भिडेंविरोधात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले संभाजी भिडे?
अमरावतीच्या बडनेरामध्ये झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. "मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले," असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं.
संभाजी भिंडे यांना देशातून तडीपार करा - यशोमती ठाकूर
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संभाजी भिंडे यांना अटक करून त्यांना महाराष्ट्र सह देशातून तडीपार करण्याची मागणी काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी मागणी केली आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी व देशाबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत, अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत व त्यांचे आजोळही हेच आहे. त्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. पोलिसांनी व गुप्तचर विभाग झोपलं आहे का असा सवालही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. राज्यसरकारचं भिडेंना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
यवतमाळमध्ये संभाजी भिडेंविरोधात निदर्शने
यवतमाळमध्ये संभाजी भिडे यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहे. आंबेडकरी संघटनांकडून ही निदर्शने करण्यात आली आहे. महात्मा गांधी व महापुरुषांविरोधात वादग्रस्त वक्तव्य तसेच नेहमी अतार्किक मुद्दे मांडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम संभाजी भिडे करत आहे आणि शासन त्याला पाठबळ देत आहे असा आरोप करत आंबेडकरी संघटनांनी निदर्शने केली.