नागपूर : काँग्रेसचे तानाजी वनवे नागपूर महापालिकेचे विरोधी पक्षनेता तसंच काँग्रेसचे पालिका गटनेते असणार आहेत. गटनेते पदावरून नागपूर महापालिकेत सुरु असलेल्या काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला, नागपूर खंडपीठाच्या या निर्णयानं पूर्णविराम लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायलयाच्या या निर्णयानं माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. नागपूर महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसतर्फे नगरसेवक संजय महाकाळकर यांना पालिका गटनेते बनवण्यात आलं होतं. मात्र महाकाळकर यांच्या विरुद्ध बंड पुकारत तानाजी वनवे यांनी १७ नगरसेवकांसह गटनेते पदावर दावा केला होता.


नागपूर पालिकेतल्या काँग्रेसच्या २९ पैकी १६ सदस्यांनी वनवे यांना पाठिंबा दर्शविल्यानं, गटनेतेपदी वनवेंची निवड करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला होता. विभागीय आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध महाकाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. या प्रकरणी निर्णय देताना, न्यायालयानं तानाजी वनवे यांची निवड वैध ठरवली.