मुंबई : मास्क, व्हेंटीलेटर, पीपीई किट देणार नाही असे केंद्राचे पत्र आले आहे. केंद्राने पूर्णतः पाठिंबा काढून घेणे योग्य नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्याबाबत काल प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलणे झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री आणि पंतप्रधानांना राज्य सरकार पत्र लिहिणार असल्याचेही टोपे म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनलॉक करतोय, जिल्हा बंदी उठवली, ई पास बंद केले, कार्यालयातील उपस्थित वाढवली आहे त्यामुळे संसर्ग वाढतोय असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. मास्क घातला नाही तर दंड आहे, तरीही २५ ते ३० टक्के लोक मास्क वापरत नाहीत. एकट्या पुण्यात मास्क घातला नाही म्हणून आतापर्यंत १ कोटी दंड वसूल केल्याचेही ते म्हणाले. १५ सप्टेंबरपासून स्वस्थ महाराष्ट्र मोहीम राबवली जाणार असल्याचे ते म्हणाले. यात ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर दिला जाणार आहे.


जशी संख्या वाढणार तसा ताण पडतो आणि बेड मिळत नाही. ज्यांना लक्षणं नाहीत अशा पॉझिटिव्ह रुग्णांनी घरीच राहिलं पाहिजे. ८० टक्के लोकांना लक्षणे नसतात,  त्यामुळे काळजी घ्यायला हवी असेही ते म्हणाले.



आपण जम्बो हॉस्पिटलमधचे ऑक्सिजन बेड वाढवले आहेत. उपचारांसाठी अडचण येऊ नये म्हणून आयसीयू बेड वाढवत असल्याचे टोपे म्हणाले. 


जम्बो कोविड सेंटरमधील सुविधा बाहेरून घेतल्या जातात. ज्यांना काम दिलंय त्यांनी कराराप्रमाणे काम करायला हवं. त्यांना जमत नसेल तर बदला असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिलाय. डॉक्टर, नर्सेस, इतर सुविधा पुरवत नसतील तर एजन्सीकडून काम काढून घ्या आणि ते काम दुसर्यांना द्या असं आरोग्यमंत्री म्हणाले.


आज सहा जिल्ह्यात टेली आयसीयू सुरु केलेत. रुग्ण वाढत असताना आयसीयू बेडवर ताण येतोय.