Mumbai Local News Update: लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लाखो मुंबईकरांचा प्रवास लोकलवर अवलंबून आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करत असतात. सकाळ व संध्याकाळच्या वेळेत लोकलला भयानक गर्दी असते. अनेकजण दरवाजातून लटकत प्रवास करतात. त्यामुळं कधी कधी अपघात घडण्याचाही धोका असतो. लोकलवरील गर्दीचा भार हलका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना आखल्या जातात. मात्र, तरीही ही गर्दी काही कमी होत नाही. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने आणखी एक तोडगा काढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकलची गर्दी कमी व्हावी यासाठी मध्य रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल केले होते. त्यानंतरच आता याला व्यापक स्वरुप यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मध्ये रेल्वेने मुंबईतील सरकारी, निमसरकारी कार्यालयासह ३५० संस्थांशी गेल्या १६ दिवसांत पत्रव्यवहार केला असून कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत विनंती केली आहे.


मध्य रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळी तीन ते चार मिनिटांनी एक फेरी धावते. मात्र वाढत्या गर्दीमुळं लोकलसेवेवर ताण येतो. यामुळंच मध्य रेल्वेने त्याच्या कर्मचाऱ्यांना दोन पाळ्यांमध्ये विभागले आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयाप्रमाणेच इतर संस्थांनीही त्यांचे अनुकरण करावे, अशी विनंती मध्य रेल्वेने केली आहे. 


यासाठी १ नोव्हेंबरपासून रुग्णालये, महापालिका, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रसिद्धीमाध्यमे, खासगी संस्था, बँकांना कार्यालयीन वेळांमध्ये बदलांची विनंती करण्यात आली आहे. या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


मध्य रेल्वेचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबईकरांचा प्रवास थोडा आरामदायक व सुकर होणार आहे. गर्दी कमी झाल्याने व लोकल फेऱ्यात वाढ झाल्याने खासगी कर्मचाऱ्यांना वेळेत ऑफिस गाठणे शक्य होणार आहे. मध्य रेल्वेने त्यांच्या कार्यकालीन वेळेत बदल केल्यानंतर अने प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. त्याप्रमाणेच आता मध्य रेल्वेच्या पत्रावर काय प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


शनिवार-रविवार मेगाब्लॉक


मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आणि इतर अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – सांताक्रूझदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.