Mumbai Local News Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पालघर ते चर्चगेट असो किंवा कर्जत- सीएसएमटी असो. मुंबई लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते. कधीकधी गर्दीमुळं अपघात घडण्याचीही शक्यता असते. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मध्यंतरी एक तोडगा काढला होता.त्यामुळं लोकलमधील गर्दीचा भार हलका होण्यास मदत झाली होती. मध्य रेल्वेच्या या निर्णयांनंतर अनेक संस्थान व कर्यालयाने याच निर्णयाची अमंलबजावणी केली आहे. त्यामुळं लोकलमधील गर्दी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई लोकलमध्ये पिक अवरमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच मध्यंतरी मध्य रेल्वेने कार्यलयीन वेळेत बदल केला होता. मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ बदलली होती. तसंच, इतर सरकारी संस्था व निम्न सरकारी संस्थांना कार्यलयीन वेळेत बदल करण्याचे आवाहन केले होते. जेणेकरुन सकाळ व संध्याकाळच्या वेळेत लोकलमधील गर्दी कमी राहिल. मध्य रेल्वेने केलेल्या आवाहनानंतर अनेक कार्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जवळपास 13 संस्थांनी त्याच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल केले आहेत. कर्मचाऱ्यांची सुरक्षा ध्यानात घेऊन कंपन्यांनी हा बदल केला आहे. त्यामुळं आता या कर्मचाऱ्यांचे पिक अवरमध्ये लोकलने प्रवास करण्याचे टेन्शन संपणार आहे. 


मुंबई व उपनगरातील 13 कंपन्यांनी मध्य रेल्वेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यानुसार त्यांच्या कार्यलयीन वेळांमध्ये बदल केले आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जनरल पोस्ट ऑफिस मुंबई, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, भाभा अणु संशोधन केंद्र (BARC), ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, बजाज इलेक्ट्रिकल्स, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, सामान्य विमा महामंडळ, गोदरेज आणि बॉयस, गॅमन इंडिया लिमिटेड, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC), जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट, आणि रोश प्रॉडक्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी त्याच्या कार्यालयीन वेळेत बदल केला आहे. 


या कंपन्यांची कार्यालय मुंबईतील विविध भागात आहेत. दक्षिण,मध्य मुंबई आणि बीकेसी येथे सर्वाधिक कार्यालये आहेत. एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयीन वेळेत बदल केल्याचा खूप सकारात्मक फरक पडला आहे. माझ्या कार्यालयाने कर्मचार्‍यांसाठी गर्दीच्या वेळेस प्रवास टाळण्यासाठी अधिकृत वेळा बदल केल्या आहेत त्यामुळं प्रवासात होणारा त्रास कमी झाला आहे. हा निर्णयही खूप उपयुक्त आहे, असं एका कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. 


दरम्यान, मध्य रेल्वेबरोबरच मुंबई परिसरातील रेल्वेची कारशेड आणि स्थानकात कार्यरत असलेल्य कर्मचार्‍यांनाही वेळात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळं रेल्वे मुख्यालयातील कर्मचार्‍यांनाही पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर १५०० पैकी ४०० कर्मचारी सकाळी साडेनऊ ऐवजी अकराच्या वेळेला कार्यालयात येत आहेत.रेल्वेने आता मुख्यालयासोबतच कारशेड आणि रेल्वे स्थानकांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना हा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सुचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहे.