किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : चोरीच्या मालाची परदेशात विक्री करणाऱ्या चादर गँगला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या अँपल शोरुमचा गुन्हा उघडकीस करतांना या चादर गँगचं नेपाळ आणि बांगलादेश कनेक्शन असल्याचंही समोर आलं आहे. नाशिकच्या गंगापूर रोडवर असलेलं ऍपल शोरुम भल्या पहाटे फोडून, चोरट्यांनी ऍपल कंपनीचे महागडे मोबाईल, हेडफोन्स, स्मार्ट वॉच आणि पावणेदोन लाखांची रोकड असा तब्बल ७५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर नाशिकच्या गुन्हे शाखेच्या पथकाने याचा छडा लावला. त्यात तब्बल सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस तपासात या चोरट्यांच्या चादर गँगने २०१८ मध्ये सॅमसंगचे शोरूम फोडल्याचंही पुढे आलं.


चोरट्यांची चादर गँग नेमकं काय करत होती?


चादर विकण्यासाठी डोक्यावर गाठोडं घेऊन ही गँग शहरात फिरत रेकी करायची. मोठं शोरूम बघून त्या ठिकाणी बाहेर थांबायचे. शोरूमच्या शटरजवळच ठाण मांडायचे. शोरूमला इतक्या सकाळी कोणी नसल्यानं बाजूला चादर धरून काही लोक उभे राहायचे. त्यानंतर एक दोन जण शटर फोडून आतमध्ये प्रवेश करायचे आणि महागड्या वस्तू घेऊन बाहेर पडत शहरातून पोबारा व्हायचे.


या गँगने नाशिक शहरात आत्तापर्यंत दोन शोरुम फोडले. शोरुममधल्या महागड्या वस्तू नेपाळ, बांग्लादेशमध्ये जाऊन विकायचे. हे सर्व आरोपी बिहारमधले असून त्याठिकाणी बिहार पोलिसांनी अनेकदा त्यांच्यावर कारवाईदेखील केली आहे. कुख्यात चादर गँग म्हणून या टोळीला ओळखलं जायचं.


दरम्यान, राज्यात फोडलेल्या मोबाईल शोरुमच्या बाबतीत आता अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांकडून व्यक्त केली जात आहे. नेपाळ आणि बिहार पोलीस तब्बल २३ दिवसांपासून या चादर गँगच्या मागावर होते. मात्र त्याचवेळी नाशिक पोलिसांनी त्यांना गजाआड करत मोठया टोळीच्या गुन्हेगारांचा बंदोबस्त केला आहे.