प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार :  महाराष्ट्रात चड्डी बनियान गॅंग (Chaddi Baniyan Gang) पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. नंदुरबार (Nandurbar) शहरातील नवापूर येथे चड्डी बनियान गॅंगची पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही ठिकाणी चोरी करताना ही गॅंग सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या गॅंगवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. पोलीस सध्या या चोरट्यांचा शोध घेत आहेत.


शहरातील अनेक भागांमध्ये या टोळीने चोरीचा प्रयत्न केला आहे. तर काही ठिकाणी तो यशस्वी झाला आहे. काही ठिकाणी दक्ष नागरिकांनी या चड्डी बनियन गॅंगच्या चोरीच्या प्रयत्न हाणून पाडला आहे.


काही घरांमध्ये चोरी करताना चड्डी बनियन गॅंगचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. यामुळे आता नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


चड्डी बनियन गॅंगच्या वाढत्या हिमतीमुळे पोलीस हतबल झाले आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता चड्डी बनियन गॅंगचा धुमाकूळ आणि दहशत संपवण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.


दरम्यान, आतापर्यंत चड्डी बनियान गॅंगचा एकही  सदस्य नवापूर पोलिसांच्या हाती लागलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. 


चड्डी बनियान गॅंगही  शहरात दुचाकीचे पेट्रोल चोरण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. ताज्या घटनेत चोरट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला आहे.


नवापूर शहरातील अल शिफा रुग्णालयाजवळील वॉल कंपाऊंडचा दरवाजा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न या टोळीच्या सदस्यांनी केला होता. मात्र तेथे उपस्थित पाळीव कुत्र्याने भुंकायला सुरुवात केल्याने चोरटे घाबरून पळून गेले. 


यानंतर चोरट्यांनी घराच्या वरच्या मजल्यावर प्रवेश केला. मात्र ते काही चोरण्याआधीच घरातील सदस्य जागे झाल्याने चोरट्यांना घटनास्थळावरून पळ काढावा लागला.


या चोरट्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवापूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान नवापूर पोलिसांसमोर आहे.