मुंबई : राज्यात पुन्हा एकदा ऊसदराच्या आंदोलनाची चर्चा सुरु झाली आहे. साखरेला बाजारपेठेत भाव नसल्यामुळं साखर कारखानदारांनी एफआरपी देणं शक्य नसल्याचं म्हणत हात वर केले आहेत. दुसरीकडं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एफआरपी अधिक २०० रुपये दर मिळाल्याशिवाय ऊसतोड होवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत ऊस पट्ट्यात हिंसक आंदोलन सुरु केली आहेत.


मागील हंगामातील थकित रक्कम आणि यावर्षीची मागणी पूर्ण करावी, यासाठी स्वाभिमानीनं रविवारी बंदचं हत्यारचं उपसलं आहे. या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सावध पवित्रा घेत साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम दिलीच पाहिजे, अशी भूमिका घेतलीय. तर सरकारनं मदत केल्याशिवाय एफआरपी देणं शक्य नाही, असं कारखानदारांचं म्हणणं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा ऊस दराची कोंडी निर्माण झाली आहे.