`मला कोणी शिकवण्याची गरज नाही`; महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची दिलगिरी
शाळांसाठी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी भीक मागितली होती असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते
Maharashtra Politics : शाळांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) आणि महात्मा फुलेंनी (Mhatma Phule) भीक मागितली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. त्यानंतर राज्यभरात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मला कोणी शिकवण्याची गरज नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
"झोपलेल्या जागे करता येत पण झोपेचे सोंग घेतलेल्या जागे करता येत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मी हार घालावा यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरवादी आले होते. यावेळी त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. बाबासाहेबांच्या एकूण चिंतनामधील मी जेवढं वाचलंय तेवढं ज्यांनी वाचलं आहे त्यांनी माझ्या समोर चर्चेला यावे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्याबद्दलचा आदर मला कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. तो माझ्या मनामध्ये आहे," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
"बाबासाहेबांनी शिका आणि संघटीत व्हा ही घोषणा दिली नसती तर फार मोठ्या प्रमाणात वर्ग अशिक्षित राहिला असता. मी वर्गणी म्हणायला हवं होतं असे ते म्हणत असतील तर त्याकाळात तसे शब्द नव्हते. त्या काळात भीक मागून मी संस्था उभी केली असे म्हटले जायचे. तरीही भीक शब्दाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे," असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
औरंगाबादेत मराठवाडा विद्यापिठाच्या संतपीठाच्या पहिल्या तुकडीच्या प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात बोलत होते. "सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते. 10 कोटी देणार लोक आहेत ना", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.