मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सोमवारी स्वबळाचा नारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रदेश भाजपमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, दुसऱ्या राजकीय पक्षातून आलेले अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आलेले नेते पॅनिक झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे डॅमेज कंट्रोलचा मार्ग अबलंबिताना दिसत आहे. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाचे वक्तव्य करत आयारामांना थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण करण्यासाठी हा खटाटोप करत असल्याचा आरोप आता सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांचा भूमिकेला चंद्रकांत पाटील यांचा छेद देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.


राज्याच्या हितासाठी आपण आजही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार आहोत, असे वक्तव्य  चंद्रकांत पाटील यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. महत्त्वाचे म्हणजे  जे पी नड्डा यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संवाद साधताना पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची सूचना दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
 
राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार आहोत. मात्र शिवसेना आणि भाजप एकत्र आले तरी निवडणूक मात्र वेगवेगळे लढू, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या भूमिकेवरुन जोरदार चर्चा रंगत आहे.