चंद्रपूर : शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरात  १७ ते २० जुलै दरम्यान लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. राज्यात सुरुवातीच्या काळात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी चंद्रपूर जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, या ग्रीन झोन जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि आता पुन्हा या ठिकाणी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 १७ जुलै ते २० जुलै असे चार दिवस कडक लॉकडाऊन अणार आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद असणार आहेत. हा लॉकडाऊन केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातीत उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी १७ ते २० जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये, चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे , असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.



बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. ते त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांनी माहिती लविण्याचा प्रकार केला तर त्यांच्यावर प्रशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा नको, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचवेळी अत्यावश्यक असेल आणि तुम्ही घराबाहेर पडत असाल तेव्हा मास्क हा अनिवार्य आहे. दैनंदिन काम करताना सुरक्षित अंतर ठेवून काम करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान, जिल्ह्यात विवाह समारंभामुळे कोरोना बाधितांचा आकडा वाढल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यात आता कडक बंधने असणार आहेत. किंवा लग्न पुढे  ढकलावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार कोरोना रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या २०८ वर पोहोचली आहे. चंद्रपूर शहरात एक आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील कुर्झा, बोरगाव आणि लाखापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण अशी वाढ झाली आहे. आतापर्यंत १०३ रुग्ण बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण १०५ आहेत.