Chandrapur Crime : रात्री झोपायला गेले अन्... मंदिरातच शेतकऱ्यांचे मृतदेह आढळ्याने खळबळ
Chandrapur Crime : बुधवारी रात्री दोन्ही शेतकरी मंदिरात झोपण्यासाठी गेले होते मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : बुधवारी रात्री चंद्रपुरात (Chandrapur News) घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. चंद्रपुरच्या (Chandrapur crime) भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील एका मंदिरात (Temple) दोघांचे मृतदेह आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला असला. दोघेही मृत गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांचीही मंदिरात हत्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपुरच्या भद्रावती तालुक्यातील मांगली गावाशेजारी जगन्नाथ बाबांचे छोटे मंदिर आहे. याच मंदिरात झोपलेल्या गावातील दोन ग्रामस्थांचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. मधुकर खुजे (55) आणि बापूराव खारकर (65) अशी खून झालेल्या ग्रामस्थांची नावे असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिरात धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, हत्या झालेले दोघेही शेतकरी होते आणि त्यांची मंदिराशेजारीच शेती होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ते मंदिरात झोपायचे. मात्र बुधवारी रात्री मंदिरात झोपलेला गेल्यानंतर दोघांचीही हत्या करण्यात आली. दोघांचेही मृतदेह गुरुवारी पहाटे रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला होता.
दुसरीकडे, मृत व्यक्तींची हत्या कशी झाली याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे मंदिरातील दानपेटी गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर भद्रावती पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
जळगावात काढले देवाचे डोळे
दरम्यान, जळगावमधील एका प्राचीन मंदिरातील देवीच्या मूर्तीचे चांदीच्या डोळ्यांची चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील प्राचीन मुधाई देवीच्या मंदिरात ही चोरीची घटना घडली आहे. मुदाई देवीच्या मूर्तीचे चांदीचे डोळे अज्ञाताने चोरी केले आहेत. या घटनेमुळे वाघळी गावात खळबळ उडाली आहे. जळगाव मधील मुधाई देवीचे मंदिर हे अतिशय प्राचीन आहे. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिरात घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.