COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : ज्यानं शेतीवर प्रेम करत, शेतीत नवे प्रयोग करत अख्खी हयात घालवली, असे चंद्रपूरचे शेतकरी दादाजी खोब्रागडे सध्या प्रचंड आजारी आहेत.याच दादाजी खोब्रागडेंनी तांदुळाच्या HMT वाणासह तब्बल ९ वाणं विकसित केली.... राष्ट्रपतींच्या पुरस्कारासह फोर्ब्सच्या यादीतही त्यांचं नाव झळकलंय. पण आता त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. अनेक भारतीयांचं पोट भात खाल्ल्याशिवाय भरत नाही, अशा तांदुळाची ९ वाणं ज्यांनी विकसीत केली, त्या दादाजी खोब्रागडेंना वेगवेगळे सन्मान मिळाले. देशाला तांदुळाच्या वाणांचं दान देणारे दादाजी खोब्रागडे आज अंथरुणाला खिळलेत. चंद्रपुरातल्या नांदेड या छोट्या गावात त्यांची शेती आहे. पण शेतात नापिकी असल्यानं या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली आहे. दादाजींची आर्थिक स्थितीही बिकट आहे.... त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पण त्यांच्या उपचारासाठीही पैसे नाहीत. उपचारांसाठी त्यांनी सरकारकडे मदत मागितलीय, पण अजून उत्तर किंवा पैसे मिळालेले नाहीत.


नांदेड या गावात शेती करतानाच ८० च्या दशकात दादाजींनी धानावर विविध प्रयोग केले. त्यामधूनच धानाची ९ वाणं त्यांनी विकसित केली. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे संशोधन सगळ्यांनाच मुक्तहस्ते वाटलं. त्यासाठी पैशाची मागणी त्यांनी कधी केली नाही. त्यांनी विकसीत केलेली HMT ही धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते. पण तीन वर्षांपासून दादाजी पक्षाघातानं आजारी आहेत.


दादाजींनी देशातील धान वाणांच्या संशोधन आणि विकासासाठी आपले आयुष्य खर्ची घातलं. मात्र त्यांना आता शासकीय अनास्थेचा सामना करावा लागतोय. सरकारनं आजवर त्यांना अनेक पुरस्कार दिले. पण स्वतःच्या संशोधनाचा कवडीइतकाही मोबदला न घेणारा संशोधक एवढा आजारी असताना त्याच्या  उपचारासाठी पैसे दिले तरच ती खरी मदत ठरणार आहे.