आशीष अम्बाडे, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना पोलीस मुख्यालय मैदानावर अखेरची मानवंदना देण्यात आली. चंद्रपूरमध्ये दारुबंदी झाल्यानंतर पोलीस पथकावर अनेकदा हल्ले झाले. मात्र दारुबंदीसाठी पोलीस अधिकारी शहीद झाल्याची ही पहिलीच घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयात सरकारी इतमामात चिडे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सर्वांनाच गहिवरुन आलं होतं. नागभीडमध्ये दारू तस्करी रोखताना छत्रपती चिडे यांना वीरमरण आलं. एका स्कॉर्पिओमधून अवैध दारू भरून येत असल्याची माहिती प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांना मिळाली. मौशी वळणावर त्यांनी आपल्या पथकासह नाकाबंदी केली. संशयित वाहन येताच चिडे यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव वेगानं आलेली स्कॉर्पिओ समोरच्या ट्रॅक्टरवर धडकली. 


स्कॉर्पिओ पळून जाऊन नये म्हणून पोलीस पथकानं मागून धाव घेतली. मात्र दारू तस्करांनी वेगानं स्कॉर्पिओ रिव्हर्स घेतली आणि पोलीस उपनिरीक्षक चिडे यांना चिरडलं. काही कळण्याच्या आतच दारू तस्कर स्कॉर्पिओमधून फरार झाले. गडचिरोलीतील कुख्यात दारू तस्कर साहिल शहजाद हा यात प्रमुख आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय.


मात्र या धुमश्चक्रीत चिडे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला वीरमरण आलं. त्यांना अखेरची आदरांजली वाहण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सामान्य नागरिकांनीही गर्दी केली होती. बंदुकीच्या ३ फैरी झाडून चिडे यांना मानवंदना देण्यात आली. शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिडे यांना शहीद दर्जा देण्याचं आश्वासन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यावेळी दिलं. तर चिडे कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रूपये आर्थिक मदत देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.


चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन आता ४ वर्षं उलटली. मात्र अवैध दारू तस्करी अजूनही सुरू असल्याचं यानिमित्तानं समोर आलंय. दारू तस्करांना वेसण घालण्यासाठी कायद्याचे हात आणखी बळकट करण्याची गरज आहे. शहीद छत्रपती चिडे यांना तीच खरी आदरांजली ठरेल.