Lockdown : गाव गाठण्यासाठी `तो` ८०० किलोमीटर चालला
एका तरुणाने असं काही केलं, ज्याची सध्या सर्वदूर चर्चा सुरु आहे.
मुंबई : CORONAVIRUS कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन लागू झाल्याची घोषणा केल्यानंतर परराज्यातून आलेल्यांना जशी घरी जाण्याची ओढ लागली, त्यातप्रमाणे गावाकडून शहरात आलेल्यांनाही त्यांच्या परतीच्या वाटा खुणावू लागल्या. शहरातल्या खुराड्यात, कुटुंबापासून दूर असणाऱ्यांना आता घरची ओढ लागलेली आहे. ज्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या एका तरुणाने असं काही केलं, ज्याची सध्या सर्वदूर चर्चा सुरु आहे.
एकदोन नव्हे तर, तब्बल ८०० किमोमीटरचा प्रवास पायी करत अजय सातोकर याने त्यांच्या गावची वाट गाठली. पनवेलपासून चंद्रपूरपर्यंतचा हा प्रवास त्याने पायी केला आहे. मुंबईजवळील पनवेल येथे एका खासगी संस्थेत अजय कॉम्प्यूटर ऑपरेटर म्हणून काम करत होता.
कोरोनाचा विळखा वाढत असल्याचं पाहून लॉकडाऊन जाहीर झाला. पण, खिशात पैसा नसल्यामुळे आता निर्वाह करायचा कला असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. उपाशी मरण्यापेक्षा त्याने मग पनवेलपासून थेट गावचा रस्ता धरला. वाटेत मिळेल ते खायचं आणि रात्री एखाद्या गावाबाहेर मुक्काम करायचा असा प्रवास त्याने केला.
पनवेल, पुणे, नगर, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ असा प्रवास करत तो चंद्रपूरच्या घुग्गूस या ठिकाणी पोहोचला. दोन एप्रिलला सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचा हा प्रवास सुरु झाला. खिशात अवघ्या तीनशे रुपयांच्या जोरावर तो पनवेलसहून निघाला.
१७ एप्रिलला तो अखेर घुग्गूसमध्ये पोहोचला. हा पूर्ण प्रवास त्याने पायी केला, ज्यामध्ये १५० किलोमीटरसाठी त्याला इतरांच्या वाहनांची मदत मिळाली. मुळात परिस्थितीचं गांभीर्य पाहता अजयनं पनवेलमध्येच थांबणं अपेक्षित होतं. पण, लॉकडाऊनमधील एकटेपणा, तणाव त्याचला घराच्या दिशेने घेऊन गेला हेच खरं.