कत्तलीसाठी निघालेला ट्रक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अडवला; हवालदाराच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न
काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठलाग करत पकडलेल्या ट्रकमध्ये 50 जनावरे, तेलंगणात कत्तलीसाठी नेली जात होती.
चंद्रपूर : काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठलाग करत पकडलेल्या ट्रकमध्ये 50 जनावरे, तेलंगणात कत्तलीसाठी नेली जात होती. जनावरे, ट्रक थांबताच तिघांनी तेथून पळ काढला. यावेळी चालकाला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. 50 गायी-म्हशी लोहारा येथील उज्ज्वल गोरक्षण संस्थेत दाखल केल्या आहेत. राजस्थान पासिंगच्या या ट्रकच्या मालकाचा आणि मुख्य आरोपीचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
चंद्रपूर शहरात प्रवेश करणाऱ्या एका भरधाव वेगातील ट्रकने सिग्नल तोडून वाहतूक हवालदाराच्या अंगावर ट्रक नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील जनता महाविद्यालय चौकात घडली.
हा वाहतूक हवालदार थोडक्यात बचावल्यानंतर आरडाओरड झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी या ट्रकचा पाठलाग केला काही. दूर अंतरावर ट्रक थांबवण्यात कार्यकर्ते यशस्वी झाले.
ट्रक थांबताच ट्रक मधून तीन व्यक्तीं उडी मारून पसार झाले. तर ट्रक चालकाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. या ट्रकच्या झडतीत ताडपत्री झाकून 50 जनावरे असल्याचे स्पष्ट झाले.
तेलंगणात जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचेही स्पष्ट झाले. दरम्यान हा ट्रक वाहतूक पोलीस शाखेत आणण्यात आला व तेथे रामनगर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली. या सर्व जनावरांना शहरालगत लोहारा येथे असलेल्या उज्वल गोरक्षण संस्थेत पाठविण्यात आले आहे.
चंद्रपूर मार्गे तेलंगणात मोठ्या संख्येत जनावरे तस्करी होत असून या घटनेने ते सिद्ध झाले आहे.