धक्कादायक : गुप्तधनासाठी नवविवाहीतेला ५० दिवस उपासमार, मारझोड
समीर चौथा विवाह करणार असल्याची माहिती मिळताच वाघाडे कुटुंब कारेकरांना धडा शिकवण्यासाठी पुढं सरसावलं
आशिष अम्बाडे, झी २४ तास, चंद्रपूर : गुप्तधनासाठी नवविवाहितेचा भयानक छळ सुरू असल्याचं धक्कादायक प्रकरण चंद्रपुरात उघड झालंय. विशेष म्हणजे सुशिक्षित, मातब्बर घरामध्ये हा विकृत अंधश्रद्धेचा प्रकार सुरू होता. धक्कादायक, क्रूर आणि अघोरी असा हा प्रकार घडलाय चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातल्या सावरी बीडकर गावात... या गावातील समीर गुणवंत कारेकर याच्याशी ऑगस्ट २०१८ मध्ये सविताचं लग्न झालं. ती गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरीच्या वाघाडे कुटुंबातली...
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधू सविता हिला रात्री अडीच वाजता झोपेतून उठवण्यात आलं. घराच्या अंगणातला पुरातन दर्गा धुवून साफ करण्यास सांगण्यात आलं. दर्ग्यातल्या जिवंत कासवाला आंघोळ घालून पूजा-अर्चा करण्यात आली. सुमारे दोन तास त्याला मुरमुरे खाऊ घालण्यास सांगण्यात आलं.
याच दरम्यान समीरच्या अंगात ताजुद्दीन बाबा आला. त्यानं सविताला बेदम मारहाण करून चटके देण्यास सुरुवात केली. यात सासू-सासऱ्यांचाही सहभाग होता. नववधूची हळद उतरण्याआधीच तिचा असा छळ सुरू झाला.
कारेकर यांच्या घराला उंच संरक्षक भिंत असल्यानं हा प्रकार शेजाऱ्यांना कळलाच नाही. मग दरदिवशी हा अघोरी प्रकार सुरू झाला.
सूर्योदय ते सूर्यास्त या काळात सविताला उपाशी ठेवून पूजा करण्याची सक्ती करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, गुप्तधन मिळवण्यासाठी हे सगळे प्रकार सुरू होते.
सविताचा मोबाईलदेखील सासरच्या मंडळींनी काढून घेतला. याच काळात समीरचं हे तिसरं लग्न असल्याची धक्कादायक माहिती सविताला मिळाली. या छळाची कुणकूण लागताच सविताच्या वडिलांनी मुलीला माहेरी नेली. पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. मात्र काहीच कारवाई झाली नाही.
दरम्यान, समीर चौथा विवाह करणार असल्याची माहिती मिळताच वाघाडे कुटुंब कारेकरांना धडा शिकवण्यासाठी पुढं सरसावलं. 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या कार्यकर्त्यांच्या कानावर हा सगळा प्रकार घालण्यात आला. त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधल्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
विशेष म्हणजे आरोपी कारेकर कुटुंबाला समाजात मातब्बर आणि सुशिक्षित म्हणून मान आहे. पण अंधश्रद्धेचा पगडा सुशिक्षितांच्या मनावरही किती खोलवर आहे, याचंच उदाहरण यानिमित्तानं पुढं आलंय.