आशीष अम्बाडे, झी मीडीया, चंद्रपूर : चले जावचा संघर्ष, विदेशी कापडांची होळी, क्रांतिकारकांनी चेतवलेले स्फुल्लिंग या सर्वात एक समान धागा म्हणजे 'स्वदेशी उत्पादनाची चळवळ' ठरली. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्वदेशी वस्तूंच्या उत्पादनासाठी देशभर जाणीवपूर्वक केंद्रे उभारली. मात्र सध्या या केंद्राची दुरवस्था झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील असेच एक खादी निर्मिती केंद्र अखेरची घटका मोजत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथले खादी निर्मिती केंद्र हे चंद्रपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळातही राजकीय घडामोडींचे महत्त्वाचे ठरले. याच गावात महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाग विदर्भ चरखा संघाची खादी निर्मिती केंद्राची इमारत आहे. आजही अत्यंत निसर्गरम्य असे हे ठिकाण दोनदा बापूंच्या वास्तव्याने पुनीत झालेले आहे. या केंद्रात खादी आणि स्वदेशी वस्तूंच्या निर्मितीची प्रक्रिया होत असे. 


नव्वदच्या दशकापर्यंत या केंद्रात उत्तम दर्जाचे खादी कापड निर्मिले जात असे मात्र त्यानंतरच्या काळात खादीची मागणी घटली व त्याचे दैनंदिन वापरातील चलन कमी झाल्याने या केंद्राला घरघर आणि कर्मचारी वर्गाला बेरीजगारीची झळ बसू लागली. 1933 आणि 1936 अशा दोन वेळेस बापू या केंद्रात आले होते. महात्मा गांधींच्या मानस पुत्राचा विवाह सोहळा देखील याच परिसरातील एका झाडाखाली झाला होता.



गेले काही वर्षे खादीच्या सार्वजनिक जीवनातील चलतीची चर्चा होत आहे. आजचा युवा वर्ग पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला आहे असेही बोलले जाते. मात्र प्रत्यक्षात खादी निर्मितीची केंद्रे ओस पडत चालली आहेत. 


विणकरांच्या अभावामुळे इथली कापड निर्मिती प्रक्रिया बंद असून केवळ उत्तम दर्जाचा धागा तयार करून तो अन्य ठिकाणच्या खादी केंद्रात पाठविला जातो.


प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खादीच्या प्रचार-प्रसारासाठी व बापूंच्या विचाराला बळकटी देण्यासाठी तरी सरकार ठोस निर्णय घेत या केंद्रांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देईल अशी आशा आहे.