तिकडे काय होतंय, ते बघून येतो... छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना असा दाखवला `कात्रजचा घाट`
अजित पवार, पटेलांसह 9 मंत्र्यांवर कारवाई करणार. न्यायालयीन लढा लढणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar : अजित पवार यांच्या बरोबर (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या मोठमोठ्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या नेत्यांपैकी सगळ्यात आश्चर्यकारक नाव होतं ते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचे. तिकडे काय होतंय, ते बघून येतो असं शरद (Sharad Pawar) पवारांना सांगून भुजबळ जे गेले ते थेट त्यांनी मंत्रिपदाची शपथच घेतली. छगन भुजबळ यांनी दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. छगन भुजबळ आता संपले असं म्हणणा-यांना भुजबळांनी पुन्हा खणखणीत उत्तर दिले आहे.
पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी घेतले छगन भुजबळ यांचे नाव
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतल्यानंतर शरद पवार यांवनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव घेतले. शपतविधीच्या घडामोडी घडत असताना छगन भुजबळ यांनी मला फोन केला. तिकडे काय होतंय, ते बघून येतो असे ते म्हणाले. नंतर थोड्याच वेळात छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे समजले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांसह 9 मंत्र्यांवर कारवाई करण्याचा इशारा पवारांनी दिला आहे. आपण न्यायालयीन लढा लढणार नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार, असं पवारांनी स्पष्ट केलं. तर महाविकास आघाडी म्हणून यापुढं आक्रमकपणे काम करणार, असंही पवारांनी सांगितलं.
राष्ट्रवादीतला फिनिक्स
भुजबळ संपले, सद्दी संपली अशा तमाम राजकीय हिशोबांना खोटं ठरवत छगन भुजबळ यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडली आहे. राजकीय विश्वास भरारी घेणारे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतील फिनिक्स नेता ठरला आहे. शिवसेनेचा एकेकाळचा फायरब्रँड.... शाखाप्रमुख, महापौर आणि मग आमदार...... त्यानंतर बाळासाहेबांशी मंडल आयोगावरुन मतभेद झाल्यावर याच लखोबाला शिवसैनिकांनी पळता भुई थोडी केली होती.
पवारांच्या वळचणीला आल्यावर भुजबळ काँग्रेस आणि मग राष्ट्रवादीत रमले. पुढे बाळासाहेबांवर खटला भरुन बाळासाहेबांच्या अटकेची धमक दाखवलेला हा गृहमंत्री. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भाजप सत्तेत असताना 2016 मध्ये भुजबळांना ईडीनं तुरुंगात टाकलं. तब्बल 2 वर्षांनी भुजबळ तुरुंगाबाहेर आले. शाल गुंडाळलेल्या भुजबळांना पाहिल्यावर त्यांची कारकीर्द संपली असं भाकीत केलं गेलं. त्याला चुकीचं ठरवत भुजबळांनी मफलर आणखी स्टाईलनं गुंडाळला आणि 2019 मध्ये महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्री झाले. 2019 मध्ये पवारांच्या आशीर्वादानं मंत्री झालो म्हणणा-या भुजबळांनी आज अजित पवारांबरोबर शपथ घेऊन पवारांना गुरूदक्षिणा दिलीय का? असा सवाल उपस्थित होत आहे.