छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, तासभर वेटिंग ठेवल्यानंतर चर्चेसाठी बोलावलं
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
Chhagan Bhujbal Sharad Pawar Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहचले आहेत. छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भुजबळ यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर छगन भुजबळ हे दादांसोबत गेले होते. मात्र, आता भुजबळ पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे. रविवारी बारामतीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर कार्यक्रमात भुजबळांनी अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. आरक्षणाचा विषय निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला शरद पवारांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं. विरोधी पक्षातील नेते या बैठकीला येणार होते. पण संध्याकाळी ५ वाजता बारामतीमधून फोन गेला. त्यानंतर सगळ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला, असं भुजबळ म्हटले होते. त्यानंतर आज भुजबळ पवारांची भेट घेत असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी भुजबळांनी पवारांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येतंय. राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. तो कुठेतरी थांबला पाहिजे, यासाठी भुजबळ पवारांच्या भेटीला गेले आहेत. राज्यातील सामाजिक सलोखा राखला पाहिजे आणि पवार साहेब या राज्यातील मोठे नेते आहेत. म्हणून भुजबळ साहेब पवारांच्या भेटीला गेले आहेत, अशी माहिती अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे.
भूजबळ अर्धा ते पाऊण तास वेटिंगवर
शरद पवारांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्वर ओकवर पोहोचले आहेत. मात्र, अद्याप त्यांची भेट होऊ शकली नाहीये. जवळपास अर्धा ते पाऊण तास छगन भुजबळ यांना वेटिंगवर ठेवलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तब्बल तासाभरानंतर त्यांना आत बोलवण्यात आलं आहे.