मुंबई : नाशिक-मराठवाडा पाण्याच्या वादात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली आहे. मराठवाड्यातल्या बिअरचे कारखाने बंद करा तरंच पाणी वाचेल असा सल्ला भुजबळांनी दिला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्ष निर्णय घेईल असं सांगत भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यावेळी भुजबळांनी भाजप आणि शिवसेनेवरही टीकेची झोड उठवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याविषयीचे आक्षेप फेटाळल्यावर आता जलसंपत्ती प्राधिकरणानं पुढच्या २४ तासात वेगवेगळ्या धरणातून पाणी सोडण्याचे आदेश काढले आहेत. 24 तासात अहमदनगर आणि नाशिकच्या धरण समूहातून हे पाणी जायकवाडीकडे सोडण्यात येणार आहे. 


एकूण 8.99 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यात मुळा धरण समूहातून 1.90 टीएमसी, प्रवरा धरण समूहातून 3.85 टीएमसी गंगापूर धरण समूहातून 0.60 टीएमसी, गोदावरी दारणा धरण समूहातून 2.4 टीएमसी तर पालखेड धरणातून 0.60 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. तर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलीय. मराठवाड्यातील आमदारांनीही पाणी सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.