Chhatrapati Sambhaji Nagar : मुलांबाबत खंत व्यक्त करत छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar News) एका व्यक्तीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये (paithan) एका व्यक्तीने गळफास घेतले स्वतःला संपवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी 'मी आत्महत्या करत आहे' अशी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेतला आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना शिकवलं, पण ते संस्कारी निघाले नसल्याची खंत व्यक्त आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. संभाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दत्तात्रय सोरमारे (50) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास दत्तात्रय सोरमारे यांनी 'मी आत्महत्या करत आहे' अशी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यानंतर पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन दत्तात्रय सोरमारे यांनी आत्महत्या केली. रात्री पावणे बाराच्या सुमारास सोरमारे यांनी दावरवाडी शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे उघड झाले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमधून त्यांनी आपल्या कुटुंबाविषयी आणि मित्र परिवाराविषयी भाष्य केले होते. मुलांची साथ मिळाली नसल्याच्या दुःखातून त्यांनी आपलं आयुष्य संपवल्याचे सोरमारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.


काय म्हटलंय शेवटच्या फेसबुक पोस्टमध्ये?


"प्रिय मित्र आणि नातेवाईक तुम्हाला सांगताना माझा कंठ अतिशय दाटून येत आहे. कारण मी तुम्हाला यानंतर कधीही भेटणार नाही. माझ्याकडे काही मित्रमंडळी यांचे पैसे आहेत, ते पैसे परत करण्याची माझी प्रामाणिक इच्छा होती. आज ना उद्या ते पैसे परत करण्याची माझी इच्छा असताना माझ्यावर असं काही प्रसंग आला आहे की, मला नाईलाजाने आत्महत्या करावी लागत आहे. कारण माझ्यावर असा काही प्रसंग आला की, मी कोणालाही तो सांगू शकत नाही. कारण माझे एक स्वप्न होते की, माझं कुटुंब ग्रॅज्युएट व्हावे. त्यामुळे मी माझ्याकडून मुलांचे उच्च शिक्षणासाठी आटोकाठ प्रयत्न केले. कधी मला अडचण आली तरी मी कोणाकडे तरी हात पाय पसरले आणि त्यांचे शिक्षण केले. पण त्याचे फळ म्हणून मला आज आत्महत्या करावी लागत आहे. कारण मी सगळं काही करु शकलो, पण माझ्या मुलांना मी संस्कार देऊ शकलो नाही. त्यामुळे मी आज फाशी घेत आहे. न्यायालयाकडून शिक्षा मिळेल तेव्हा मिळेल, पण मी असा निर्णय घेतला की याची शिक्षा मला मिळायला पाहिजे. कारण की मी माझ्या मुलांचे शिक्षण करुन फार मोठी चूक केलेली आहे. काही माझी हितचिंतक असतील, माझे नातेवाईक असतील त्यांना माझा हा निर्णय पटणार नाही. पण मित्रहो मला माफ करा हा निर्णय माझाच आहे. आणि तुम्ही मला खरंच माफ करताल असं मला वाटत नाही, तर कृपया मला माफ करावं एवढीच हात जोडून विनंती," असे सोरमारे यांनी आत्महत्येपूर्वीच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.


दरम्यान, दत्तात्रय सोरमारे हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांच्या या टोकाच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोरमारे यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत