Chhatrapati Sambhaji Nagar: लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. नाहीतर मुलं कधी काय करुन बसतील याचा काही नेम नाही. छत्रपती संभाजीनगरमधील एका 14 वर्षांच्या मुलाने चक्क खेळण्यातील शिट्टी गिळली आहे. विशेष म्हणजे, शिट्टी गिळल्यानंतर श्वास घेताना आणि बोलतानाही शिट्टीचाही आवाज येत होता. मुलाचा हा प्रताप पाहून कुटुंबीयांनी तडक खासगी रुग्णालयात धाव घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाने शिट्टी गिळल्याचे कळताच पालकांच्या पायाखालची जमीनच हादरली ते तात्काळ त्याला घेऊन खासगी रुग्णालयात धावले. पण रुग्णालयातील उपचाराचा खर्च ऐकून त्यांचे डोकेच काम करेनासे झाले. अखेर त्यांनी मुलाला घेऊन कुटुंबीय घाटी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर तिथे असलेल्या कान-नाक-घसा विभागातील डॉक्टरांच्या विभागात त्याला नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तातडीने उपचार करुन त्याच्या घशात अडकलेली शिट्टी काढून मुलाची सुटका केली आहे. 


घाटी रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागात हा मुलगा दाखल झाला होता. तेव्हा त्याची स्थिती पाहून डॉक्टरांनादेखील आश्चर्य वाटले होते. मात्र, मुलाने गिळलेली खेळण्यातील श्वसनलिकेत शिट्टी खूप आतपर्यंत गेली होती. त्यामुळं त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. डॉक्टरांनी त्याला तात्काळ ऑक्सिजनवर ठेवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, मुलाने काही बोलण्याचा प्रयत्न केला तरी शिट्टीचा आवाज येत होता. 


डॉक्टरांनी मुलाची अवस्था पाहून त्याला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. तिथे जवळपास अर्धा तास एंडोस्कोपीद्वारे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याच्या श्वसनलिकेत अडकलेली शिट्टी काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख, डॉ प्रशांत केचे आणि डॉ. शैलेश निकम यांनी ही शिट्टी यशस्वीरित्या बाहेर काढली आहे. 



दरम्यान, खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियांसाठी किमान 30 ते 40 हजारांचा खर्च येतो. मात्र घाटी रुग्णालयात हे उपचार अगदी मोफत करण्यात आले आहेत. लहान मुले कोणत्याही वस्तू गिळण्याची भीती असते, त्यामुळं पालकांनी डोळ्यात तेल घालून मुलांकडे लक्ष ठेवावे, असं आवाहन आवाहन केलं जातं आहे.