विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर :  शनिवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhaji nagar) समृद्धी महामार्गावर (samruddhi highway) टेम्पो ट्रॅव्हलरची रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला धडकल्याने नाशिकच्या 12 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच ट्रक चालकाच्या चुकीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आईला घरी न्यायला आणलेल्या मुलाने तिचा मृतदेह पाहिल्याने रस्त्यातच हंबरडा फोडला. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस कारवाई करणार असल्याच्या धाकाने ट्रक रिव्हर्स घेताना मागच्या चाकाखाली आल्याने मुलासमोरच वृद्ध आईचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना संभाजी नगरच्या केंब्रिज चौकात घडली आहे. पुष्पाबाई वामनराव जगताप अस या वृद्ध महिलेचं नाव आहे. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने ट्रक चालकाने ट्रक रिव्हर्स घेताना मागे पाहिलं नाही. त्यामुळे वृद्ध महिला ट्रकच्या मागच्या चाकाखाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.


या घटनेत ट्रक चालक निंगराज मलप्पा बिस्मोंडे याच्या विरोधात एम.आय.डी.सी सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला येथून मुलाला भेटण्यासाठी पुष्पाबाई जगताप छत्रपती संभाजीनगर शहरात आल्या होत्या. बसमधून उतरल्यावर मुलाची वाट पाहत रस्त्याच्या बाजूला पुष्पाबाई जगताप उभ्या होत्या. त्याचवेळी ट्रक चालक निंगराज मलप्पा बिस्मोंडे याने ट्रक रिव्हर्स घेतला. यामध्ये पुष्पाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.


दरम्यान, हा सगळा धक्कादायक प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. बसमधून उतरल्यानंतर घरी जाण्यासाठी पुष्पाबाई केंब्रिज चौकात उभ्या होत्या. त्याचवेळी हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आईला डोळ्यासमोर मृत पाहताच पुष्पाबाई जगताप यांच्या मुलाने हंबरडा फोडला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


समृद्धी महामार्गावरील अपघाताला RTO जबाबदार


समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर २३ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र समृद्धी महामार्गावर काल अपघात झालेल्या ट्रकला आरटीओने थांबवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. समृद्धी महामार्गावर ट्रक थांबवणाऱ्या दोन अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असं या अधिकाऱ्यांचं नाव असून दोघेही आरटीओ असिस्टंट इन्पेक्टर आहेत.